रविवार, २४ एप्रिल, २०१६

मृत माणसे !

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कामानिमित्त पुण्याला गेलो होतो . गाडी खूपच उशिरा पुण्यात पोहोचली . सायंकाळी ४ . ०० च्या दरम्यान पुण्याच्या बस स्थानकावर उतरलो . पुण्याच्या तापमानाला मी कावलो होतो . तिथून आणखी एक रिक्षा पकडून मी पुणे रेल्वे स्टेशनला गेलो , बाहेर लागणाऱ्या रिक्षा स्टेन्डच्या बाजूच्या वाहनतळाच्या समोर एक ६०-७० वर्षांचा वृद्ध निपचित पडला होता . थोडी शहानिशा केल्यावर तो मृत असल्याचे मला समजले . माझ्या बाजूने जाणारा एक माणूस तिथून जाताना पुटपुटला कि " दोन दिवसांपासून मरून पडला आहे …" मला त्या वाक्याने कसेसेच झाले , पुणेकरांची किळस आली ! एक माणूस २ दिवस एका जाग्याला मरून पडला आहे आणि माणुसकीच्या नात्याने त्याला कुणीहि बघत नाही . ठीक आहे त्याची हि अवस्था दारूमुळे झाली असेल असे साधारण गृहीत धरून जरी विचार केला तरी माणूस म्हणून यावर कृती करता आली नसती काय ? 
मूळ विषयाला सुरुवात इथून होते . मी त्या माणसाबद्दल सांगण्यासाठी म्हणून रेल्वे पोलिसांकडे गेलो तेव्हा गायकवाड अशी नेमप्लेट असणारा पोलिस फोनवर बोलत होता . मी थांबलो त्याचं होईस्तोवर . मग हकीकत सांगितली . तोपर्यंत त्याला दुसरा फोन आला त्याने तो उचलला आणि सरळ माझ्यासमोरून तो चालत गेला . त्यानंतर मी अन्थनि नावाची नेमप्लेट असणाऱ्या पोलिसाकडे गेलो . त्याने उत्तर दिले कि , तो भाग GRF पोलिसांच्या अखत्यारीत येतो त्यांना सांगा म्हणून सांगितले . मी मग त्या पोलिसांच्या ऑफिसात गेलो तेथे असे सांगण्यात आले कि , तो भाग शहर पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही . मला या सर्व प्रकारची भयंकर चीड येत होती . मी तरिही संयमाने म्हणालो . ' जरा विचार करा , मी कोल्हापूरहून एका अधिकार्यांना भेटण्यासाठी इथे आलो आहे , ५ वाजता ऑफिस बंद होणार आहे , मला दिवसभरात परत जायचे आहे , अगोदरच गेले २० मिनिटे मला अशी उत्तरे ऐकायला मिळत आहे ; तेव्हा माणुसकी नात्याने जरा काही तरी करा ! ' मग त्यातल्या एका पोलिसाने आम्ही फोन करून कळवतो म्हणून मला दिलासा दिला . पण मला काही पटले नाही हे . मी पुन्हा प्रयत्न करावा म्हणून १०८ ला फोन करून यासंदर्भात तुम्ही काही करू शकता का म्हणून विचारले तर त्यांनी सांगितले कि, ' आम्ही फक्त जखमी पेशंटना घेऊन जाऊ शकतो मृतांना नाही ! ' मग मी माझ्या पत्रकार मित्रांना फोन केला तर त्यांनी १०० नंबरला फोन करण्याचा सल्ला दिला . मलाही तो पटला . मी तात्काळ फोन केला . फोनवर महिला होत्या त्यांना वस्तुस्थिती सांगितली . यानंतर जे त्या बोलल्या त्याने मी चांगलाच उडालो . त्या मला म्हणाल्या कि , ' ते मरून पडले आहेत कशावरून ?' मी म्हणालो ' मी बघितलंय ' . ' अहो मग तुम्ही त्यांना हॉस्पिटलात दाखल का केले नाही …… वगैरे वगैरे काही ' त्या बोलत राहिल्या . मी चिडलो . मी तब्बल ६ -७ मिनिटे फक्त फोनचा माईक तोंडासमोर आणून जोरात बोलत राहिलो कि , ' तुमच्या अशा वागण्यामुळेच अपघातातल्या जखमींना मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही . तुमची हि बोलण्याची असंवेदनशील पद्धत प्रामाणिकपणे मदत करू इच्छिणाऱ्या लोकांनासुद्धा त्यांच्या मनोदयापासून परावृत्त करते . तुमच्या पंचानाम्याच्या भानगडीचा ससेमिरा नको म्हणून लोकं घटनास्थळापासून पळून जातात . चित्रीकरण करतात पण मदत करत नाहीत …! ' खूप बोललो . त्यांचे काहीच ऐकून घेतले नाही . मग कानाला फोन लावल्यावर त्या म्हणाल्या , ' ठीकाय …ठिकाण सांगा ' . मग मी त्यांना सर्व खाणाखुणा सांगितल्या आणि फोन ठेवला . 
या प्रकरणात मला काय अनुभवायला मिळाले आणि मला तुम्हांला काय सांगायचे आहे ते तुम्हीच जाणा ! पण अपघात किंवा इतर बाबींमध्ये गरजू माणूस , प्राणी , पक्षी यांना मदत झालीच पाहिजे . तटस्थ राहण्याची भूमिका घेणे माणूसपणाला धरून नाही ......